G. A. chya kathanche Garud | Akshardhara | G. A. Kulkarni

Posted By: Akshardhara Books In: Home On: Saturday, January 20, 2018 Comment: 0 Hit: 2637

स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.
निमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.
याच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Leave your comment