नटसम्राटा’ने उलगडला ‘नट’ | Akshardhara | Shreeram Lagu, Jabbar Patel, Kusumagraj

Posted By: Akshardhara Books In: Home On: Friday, July 22, 2016 Comment: 0 Hit: 2716

भाषेचा गोडवा असलेल्या आणि बहुतांशी वेळा मुक्तछंदातून स्वैर विहार करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता ऐकणे म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणीच! आणि त्या कविता ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या आवाजात असतील तर हा एक दुग्धशर्करा योगच म्हणायचा. असाच योग सोमवारी जुळून आला आणि पुणेकरांनी डॉ. लागूंच्या बहारदार आवाजातील ‘नट’ ही कुसुमाग्रजांची कविता मनात साठवून ठेवली.

मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट अशी मुशाफिरी करणारे डॉ. श्रीराम लागूही या वेळी कुसुमाग्रजांच्या कवितेत रमले. त्यांच्या कातरणाऱ्या आवाजातल्या गोडव्याने कुसुमाग्रजांच्या कवितेला जिवंत केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरी आणि पॉप्युलर प्रकाशनातर्फे कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे एकत्रीकरण असलेल्या ‘प्रवासी पक्षी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन व कुसुमाग्रजांच्या डॉ. लागू यांच्या आवाजातील कवितांच्या ‘कवितेच्या पलीकडे’ या सीडीचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गायक पं. सत्यशील देशपांडे, रामदास भटकळ, विजया लागू, रेणुका माडीवाले आदी उपस्थित होते.

कुसुमाग्रजांनी केलेली नट कविता वाचून डॉ. लागू यांनी स्वतःमधील नटाशी एक अनोखा संवाद साधला. या संवादाने सारे सभागृह भारावले होते. ‘कुसुमाग्रजांच्या कविता छंदमुक्त आहेत. त्यात कधी आत्मचिंतनपर स्वगत, नाट्यछटेचा रंग, कधी नाट्यात्मक संवाद तर कधी कथाकथन अनुभवायला मिळते. लिखित भाषेचा गोडवा आणि गावरान भाषेचा ठसकाही अनुभवतो. कुसुमाग्रजांच्या गद्याला आंतरिक लय असते आणि डॉ. लागू यांनी लयीचे भान ठेवत वाचन खुलवले आहे. त्यांच्या वाचनातून कवितेची मूळ व्यक्तिरेखा न बदलता ती श्रीमंत झाली आहे,’ अशा भावना पं. सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केल्या. डॉ. जब्बार पटेल यांनी डॉ. लागूंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘आमच्या काळी गुडलक कॅफे विद्यापीठ होते. आणि डॉ. लागू हे त्याचे कुलगुरू! त्यांच्याकडून असंख्य गोष्टी शिकायला मिळाल्या. कुसुमाग्रज अजब रसायन होते. त्यांच्या कवितेच्या चार ओळींमधून अवघे आयुष्य दिसते.’

Comments

Leave your comment